Pavan khind

                     पावन खिंड 


पन्हाळा जिंकला आणि आदिलशाहा चिडला : अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशाहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जौहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जौहर निघाला. फाजलखानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला.


पन्हाळगडचा वेढा : सिद्दी जौहर शूर
पण क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला, की सिद्दी जौहर वेढा उठवील असे शिवरायांना वाटले, पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे ? शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. "लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो, असा निरोप त्यांनी सिद्दीला पाठवला. तो खूश झाला. त्याने ते कबूल केले.

वेढ्याच्या कामाने सिद्दीचे सैनिक कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे, हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणे-पिणे, गाणे-बजावणे व हुक्कापाणी यांत ते दंग होऊन गेले.

शिवराय वेढ्यातून बाहेर : शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार, दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणारे असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजीराजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार, एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार, अशी ती योजना होती. त्यासाठी एक बहादूर तरूण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. त्याचे नाव होते शिवा काशिद. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा धाडसी आणि चतुर होता.

ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. धो धो पाऊस पडत होता, तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली. शिवाजीराजाच पकडला ! असे समजून त्यांनी ती पालखी सिद्दी जौहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते. सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती. इकडे थोड्या वेळाने शिवा काशिदचा डाव उघडकीस आला. तेव्हा सिद्दीने संतापून त्याला तत्काळ ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवा काशिदने आत्मबलिदान केले. तो अमर झाला.
शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्दी चवताळून गेला. त्याने तातडीने सिद्दी मसऊद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली.



बाजीप्रभूचा बाणेदारपणा : चवताळलेल्या
सिद्दीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले, आता विशाळगड गाठणे कठीण. ते बाजीप्रभूला म्हणाले, "बाजी, वेळ आणीबाणीची आहे. पुढील वाट चढणीची. मागे शत्रू पाठीवर. आता विशाळगड हाती लागत नाही. चला, शत्रूला उलटून तोंड देऊया !" शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता. शिवरायांचे जीवित धोक्यात होते. सारे स्वराज्य धोक्यात होते. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज, मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हांला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. गनिमांची संख्या अफाट आहे. आपण थोडे आहोत. येथे आपला निभाव लागणार नाही. तुम्ही येथे थांबू नका. आम्ही खिंड रोखून धरतो. गनिमाला आम्ही येथेच थोपवून धरू. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा." बाजीप्रभूची स्वामिभक्ती बघून शिवराय गहिवरले. बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जिवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, “आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील; मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या.'


बाजीने शत्रूला रोखले : बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला. मग त्याने आपल्या हातात. समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या. त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगड-गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या. शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, "बहादूर मर्दानो, हुशार ! जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंड चढू देऊ नका." बाजीप्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. खिंडीतली वाट बिकट व नागमोडी होती. एका वेळी तीन-चार माणसे कशीबशी वर चढू शकत.

तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना दीड दोन तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते.

खिंडीतील झुंज : इकडे खिंडीत शर्थीची झुंज सुरू झाली. शत्रू खिंड चढू लागला.
शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. दगडधोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत. त्यांनी सराईतपणाने हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले. कित्येकांची डोकी फुटली. पहिली तुकडी नामोहरम झाली. मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, "हाणा, मारा." मावळ्यांना स्फुरण चढले. 'हर हर महादेव' अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, "शाब्बास माझ्या पठ्यांनो! फेका आणखी दगड. ठेचा गनिमांना. होऊ द्या जोराचा मारा ! शाब्बास तुमची. दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला.

तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करत होते. गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. विशाळगडाच्या पायथ्याशीही शत्रूचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला. शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते.

बाजीचा पराक्रम : इकडे घोडखिंडीत
शर्थीची झुंज अजून चालू होती. सिद्दी मसऊद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली. शत्रूने
बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी त्वेषाने लढू लागला. त्याने पराक्रमाची शर्थ केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. त्याने मधेच ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता, तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते.


ती पावनखिंड : एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. "महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो," असे म्हणून त्या स्वामिभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली, तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले, "बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्थ केली!"
बाजीप्रभूसारखे देशभक्त होते, म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामिनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. 'पावनखिंड' या नावानेच इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू
!

Comments

Popular posts from this blog

Manvachi vatchal

Maratha sardar

Shivaji maharaj