Shivrayanche balpan

            शिवरायांचे बालपण 



शिवजन्म : ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाहा शाहजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशाहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर ! शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले.

अशात जिजाबाई गरोदर होत्या, तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे करे हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट - दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या
रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले.

आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३०. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडा वाजत होता. अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदीआनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव 'शिवाजी' ठेवले.


शिवरायांचे बालपण : शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली; पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत. शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत,
त्यांना रामाच्या नि कृष्णाच्या, भीमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे.) जिजाबाई साधुसंतांच्या चरित्रांतील गोष्टीही सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधुसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली.




गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधीकधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदाभाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे ! ती पोपट. कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद ! लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फारफार आवडायचे.



शहाजीराजे मुघल बादशाहीकडे :- शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, : पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही, कारण खुद्द निजामशाहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता. त्यातून निजाम शाहाच्याच चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशाहा शाहजहानने त्यांना आपली सरदारकी
बहाल केली.

दरम्यान वजीर फत्तेखानाने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशाहाचीच हत्या केली. निजामशाहीत अंदाधुंदी माजली. फत्तेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर त्याची बक्षिसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूख मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला, तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला.


नव्या निजामशाहीची स्थापना : वजीर फत्तेखानास व मुघल बादशाहास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नरजवळच्या पेमगिरी
किल्ल्यावर त्याला निजामशाहा म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्यच स्थापन केले. य या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्थीने लढले. या कामी आदिलशाहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाहा शाहजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशाहास तंबी दिली, तेव्हा आदिलशाहाने शहाजीराजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला.

आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले; परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार? त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाइलाज होऊन १६३६ साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता, म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही; परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकांत आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापण्याच्या कार्यात उपयोगी ठरला.


जिजाबाई व शिवराय कर्नाटकातः

शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर
तिचा प्रदेश मुघल व आदिलशाहा यांनी वाटून घेतला. शहाजीराजांची पुणे-सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात. आली, तेव्हा आदिलशाहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. आदिलशाहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले.

शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. आज या किल्ल्यावर, तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ-शिवबांची धावपळ चालू असायची. त्या वेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले, तेव्हा आदिलशाहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली. आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखादया राजासारखे वैभवात राहू लागले. दरबार भरवू लागले.

Comments

Popular posts from this blog

Manvachi vatchal

Maratha sardar

Shivaji maharaj