शिवरायांचे बालपण शिवजन्म : ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाहा शाहजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशाहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर ! शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या, तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे करे हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट - दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले. आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३०. ...
Comments
Post a Comment