Santachi kamgiri
संतांची कामगिरी
महाराष्ट्रात श्रीचक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संतपरंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालविली. या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महंमद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिऊरकर यांचाही अंतर्भाव होतो.
त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनांत निर्माण केली. तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले.
श्रीचक्रधर स्वामी : श्रीचक्रधर स्वामी मूळ
गुजरातमधील एक राजपुत्र. वैराग्यवृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले. येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला. त्यांना स्त्री पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते.त्यामुळे त्यांना अनेक स्त्री-पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास 'महानुभाव पंथ' असे म्हणतात. श्रीचक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे 'लीळाचरित्र' हा ग्रंथ होय.
संत नामदेव : संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते नरसी गावचे राहणारे. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली. त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनांत निर्माण केला. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानवधर्माचा संदेश पोचवला. ते पंजाबात गेले. तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिली. त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या 'गुरुग्रंथसाहिब' या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरांतून मोठ्या भक्तीने गायले जातात.
संत ज्ञानेश्वर : संत ज्ञानेश्वर आपेगावचे
राहणारे. निवृत्तिनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू. मुक्ताबाई ही त्यांची बहीण. त्या वेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत, त्याचे कारण असे- (त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता. घर सोडले होते, पण पुढे गुरूच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना ही चार मुले झाली. हे त्या वेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते. लोक त्या मुलांचा छळ करत होते.
(ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले; पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले. इतक्यात तेथे मुक्ता आली. गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना
म्हणाली, "ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दुःखीकष्टी होऊन कसे चालेल ? जगाचे कल्याण कोण करील ?" बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला. दुःख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला, "ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा." त्यांचा उपदेश गेली सातशे वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत एकसारखा घुमत आहे.
त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झाले होते. सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून 'ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. (ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी
घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरसाल आषाढी - कार्तिकीला आळंदी - पंढरीला जातात
संत एकनाथ : संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. (ते पैठणचे राहणारे.) त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या व भारुडे लिहिली. कोणताही उच्चनीच भेदभाव मानू नका, असा त्यांनी लोकांना उपदेश केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला. गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. इतकेच नाही, तर मुक्या प्राण्यांवरदेखील त्यांनी दया केली. प्राणिमात्रांवर दया करा, असा लोकांनाही उपदेश केला. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत.
एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. वाळवंट तापले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडेतिकडे पाहिले. धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले. त्याचे डोळे पुसले. त्याला त्याच्या घरी पोहोचते केले.
अशा रीतीने स्वत:च्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली.
संत तुकाराम :
शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे. त्यांच्या घरी शेतीभाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वाडवडील अडल्यानडल्यांना कर्ज देत; पण तुकारामांनी, आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत. आषाढी-कार्तिकीला पंढरीला जात. कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. शिवरायसुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत, समतेचा उपदेश करत
जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा।"
हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला.. लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जयजयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला 'ग्यानबा-तुकाराम" हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांनाच 'ग्यानबा' असे म्हणतात. 'तुकारामगाथा' आजही घरोघरी वाचली जाते.
समर्थ रामदास
त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपारीत 'जय जय रघुवीर समर्थ' अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. रामदासांचे मूळ नाव नारायण, पण स्वत:ला 'रामाचा दास' म्हणू लागले. 'दासबोध' या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकांतून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली. (बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली.) लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे', हा संदेश त्यांनी लोकांना दिला. रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला.
साधुसंतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनांत आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्यस्थापनेसाठी उपयोग करून घेतला.
Comments
Post a Comment